Thursday, 22 December 2022

हरिश्चंद्रगड - नळीच्या वाटेने

  (हरिश्चंद्रगड नळीच्या वाटेन चढण आणि साधले घाटातून उतरण)






     खूप वर्षापासूनची इच्छा होती कि माझ्या आवडीचा किल्ला अवघड अशा अनवट नळीच्या वाटेन चढून जायचं.  २६ जानेवारी आणि पुढे शनिवार, रविवार असल्याने पर्यटनासाठी दर वेळी मिळणारी १७ सीटर गाडी मिळाली नाही. आणि मागणी जास्त असल्याने मोठ्या गाडीचे दर  अव्वाच्या सव्वा होते. म्हणून दुचाकी ने प्रवास करावा अस ठरलं. त्यात एक चार चाकी गाडी सुद्धा मिळाली. १९ जण तयार झाले.संकेत, सिद्धांत, मंगेश, विक्रम,प्रदीप मास्तर, वृषभ, धीरज, महेश, अशोक खांडेकर, अशोक घोलप, राहुल देवकर, राहुल जगधने, दादा(सुरज), दया(अण्णा).दिपाली, स्वप्नाली, अमोल (सर), अजित आणि मी(पंकज)

    तस निघायची वेळ होती संध्याकाळी 5 ची पण सवयीप्रमाणे निघायला 8 वाजले. तरीपण अजून मंगेश आणि अजित  येतच होते. पुढ जेवायची तारांबळ होऊ नये म्हणून भोसरी जवळच एका क्रिकेट च्या पीच  वर दिपाली ने बनवलेली खूप छान  बिर्याणी खाल्ली.तिथे सर्व टीम १९ जणांची एकत्र आली. पोटोबा झाला आता विठोबा ला भेटायची घाई झालेली. म्हणून मजल दरमजल करत आम्ही सर्व सकाळी 2:30 वाजता वाल्हीवरे गावात दाखल झालो.

    वाल्हीवारे गाव म्हणजे कोकणकड्याचा पायथा. सकाळी 5 ला उठून चहा वगैरे विधी आवरून बरोबर 7 वाजता गावातून नळीच्या वाटेच्या दिशेन निघालो. सोबतीला वाट नवखी असल्यामूळ कामा(गावकरी) चा मुलगा रामदास दोर घेऊन मार्ग दाखवत निघाला होता.



    सकाळी गुलाबी थंडीत सूर्याची ती सोनेरी किरण अंगावर घेत एका दमात निघालो. प्रदीप मास्तरांच्या वेगवेगळ्या आवाजाने परिसर जिवंत झाला होता,( मास्तर म्हणजे पिंजरा पिक्चर मधले नाही, खरे मास्तर). जगातल्या प्रत्येक मुलीला ताई म्हणून आवाज देणारे संन्यासी व्यक्तिमत्व आहे मास्तर. पहिल्या मोठ्या धबधाब्यापाशी  पाण्याजवळ थोडी पोटपूजा केली. आणि पुढ प्रयाण केल. कोकणकड्याच्या पोटाखालून जाणारी हि वाट कुठून चढायची हा प्रश्न सारखाच भेडसावत राहतो कारण वाट अशी ठरलेली नाहीच. दरवर्षी पाऊस पडून गेला कि वाट बदलत राहते. वरचे दगड खाली येऊन नवीन वाट तयार करतात आणि जुनी वाट हडप्पा सारखी खाली गाडली जाते. आपले पायातळ भूकंपासारख असत कारण प्रत्येक पावलाखालचा दगड हलत असतोच. आपली पायगाडी जरा जपूनच गेलीली बरी.

    राहुल जगधने हा नवीनच आणि पहिल्यांदाच किल्ला पाहायला आला होता. काहीच अनुभव नसल्याने नळीची वाट त्याला स्वर्गाची वाट वाटत होती.त्याला बाकीचे लोक पूर्ण support करत होते... त्याच्या पायाला सारखाच cramp येत होता, अवसान गेल होत पण परत माघारी फिरणं देखील अवघड होत. पण त्याला मानल पाहिजेच कारण त्यान जिद्दीने ट्रेक पूर्ण केला.

    एका ठिकाणी अलीकडच्या वर्षात दरड कोसळून प्रस्तररोहण चा नमुना तयार झाला आहे. नवख्या माणसाला देखील सहज चढता येईन अशी. थोड पुढ चढून गेल कि पहिला खरा टप्पा  प्रस्तररोहण लागतो. रामदास ने आधीच पुढ होऊन दोरी बांधली होती. अर्ध्या तासात आम्ही सर्व १९ जणांनी सुखरूप पने चढाई केली.
     
तिथून 5 मिनटात वर गेल कि दिसत कि पायाखालची जागा आता ठिसूळ अशा मातीन घेतलेली असते. आणि रौद्र अशी दरी मागे असते. आपल्याला वाटत कि इथूनच वर चढायच आहे पण तस नसून  उजवीकड जायला वाट आहे (इथ खर दोरीची गरज आहे.) तिथून तिरक चढून वर गेल कि उजव्या बाजूच्या नळीतून वर जायला सोप्पी वाट आहे. आता मात्र घड्याळात ११ वाजले होते आणि पाणी संपल होत. भुकेचे कावळे सुद्धा पोटात किंचाळत  होते. रामदास च्या चुलत बहिणीच लग्न असल्यामूळ तो इथून परत निघून गेला.


    उजव्या नळीतून वर आल्यावर एक मधोमध झाड लागत तिथून पलिकड जायला साधले घाटातून सोप्पी पण दूरची वाट आहे (वाट शोधून सापडत नाही हि गोष्ट वेगळी) तिथून उजवीकड चढून आलो कि एक छोटा अजून patch वर मस्त मोकळ पठार आणि समोर एक घनदाट छोटा टेकडीवजा डोंगर. तिथ एक लिंबू सरबत वाला मिळाला. पाणी देणार नाही पण फक्त लिंबू सरबत देणार, पाणी देणारच नाही अस त्याच म्हणन. तिथच थोड जेवण केल. (पाण्याचा एक ग्लास १० रु ). (आधी लोक पाणी फुकट द्यायची पण आता सिंहगड चा आदर्श हरिश्चंद्र ने घेतलाय. लोकांना रोजगार मिळाला आहे हि चांगली गोष्ट आहे पण माणुसकी संपवणारी रोजगारीने जन्म घेतलाय). बर असो. तिथच आमच्यातल्या काहि जणांनी विसावा घ्यायचं ठरवलं. उरलेले काही जण पाण्यासाठी मंदिराकड निघालो.

     
त्या  डोंगरातून वरती आल कि अजून एक दगड ओलांडून वर विस्तीर्ण असा कोकणकडा....डोळ्याच पारण फिटाव असा. माझ्या दृष्टिन जगताल एक आश्चर्य!!! हा कडा शब्दात व्यक्त करण खूप अवघड काम आहे त्यासाठी इथल्या मातीत याव लागत. घाम गाळून चढाव लागत. सहनशक्तीचा कस लागतो.कोकणकड्याच संध्याकाळी पुन्हा दर्शन करणारच होतो म्हणून आधी पाण्यासाठी हरीश्चंद्र च्या मंदिराकड निघालो. 15 मिनिटातच मंदिरात पोहोचलो. बिसलेरी ला फिक्क पाडणार पाणी पिल...पाणी नव्हे अमृतच.
मंदिरातच पडल्या पडल्या झोपेन आवळून धरल.तासभर गाढ झोप घेतली. अजित,अमोल सर, आणि राहुल देवकर (STI ऑफिसर) या उत्सुक गड्यांनी शेजारी असलेल्या शिव लिंगा जवळच्या लेण्यात अंघोळ केली. (बर्फासारख पाणी, एवढ गार पाणी कुठंल्याच गडावर  नसेल), काही लोकांनी पुष्करणी तलावात पाय बुडवून माशांसोबत (फिश थेरपी)वेळ घालवला. पिटुकले पिटुकले मासे जेव्हा पायांशी खेळतात  अंगावर काटे येतात.

    आम्ही वर येताना जेवनाच सामान घेऊनच निघालो होतो पण आमचे प्रमुख स्वयपाक करणारे मावळे आणि मावळीणी थकले त्यामुळ तिथच एकाला जेवण बनवायला दिल.



    संध्याकाळी पुन्हा कोकणकड्याकड प्रयाण केल. आयुष्यातली प्रत्येक संध्याकाळ घालवावी अशी ती जागा.फोटो सेशन झाल. कोकण कड्यावर बर्यापैकी महाराष्ट्राच्या बाहेरचे पर्यटक होते. काही विदेशी पर्यटकांची देखील लगबग होती. (कसली गोरी लोक हि,पिठाच्या गिरणीत काम केल्यासारखी).असो  (आपले मराठी  लोक कमीच फिरतात आणि इतिहास कमी वाचतात म्हणून पुढ जात नाहीत.) संकेत ने एक दमदार शिव घोषणा दिली, (संकेत म्हणजे रणझुंजार ट्रेकर्स चा ओबड-धोबड हिरा आहे जो कि  हळू -हळू घडतोय ) प्रत्येकाच्या मनात एक शिव भावना जागृत राहते. एक आगळा वेगळा अनुभव घेऊन पुन्हा मंदिराकड निघालो.
    अंधार पडला होता, भुकेचे डोंब उसळले होते, भाकरी होण्याची वाट पाहत होतो. खरी भूक काय असते ते इथ कळते. पिठलं-भाकरी खाऊन झाल. रात्री झोपायला त्याच ठिकाणी जागा मिळाली. मस्त पैकी शेकोटी पेटवली. शेकोटी पासून उठू वाटत नव्हत. 9:३० ला झोपायला आलो.

     
थोड्याच वेळात बोचरी थंडी जास्तच बोचत गेली. अंगावर सिंगल पांघरून होत. पण इथ संपूर्ण गादी जरी अंगाभोवती गुंडाळली असती तरी कमी पडली असती.पुन्हा शेकोटी पेटवली. इथ झोप कोणालाच लागत नवती. सर्व जण सारखे आत बाहेर करत रात्र जागवत होते. जवळच्याच एका तंबूतून एक व्यक्ती घोरत होता. तस त्याला घोरण म्हणता येणार नाही करत तो गरजत होता, बरसत होता. वाघासारखा डरकाळात होता. त्याच्या तम्बुजवळ एक कुत्र आवाजान आल. कुत्राला आवाजावरून काहीतरी वेगळच वाटत होत. कुत्र बावचाळल होत. तब्मुजवळ त्याची गम्मत पाहून आमच हसून हसून पोट दुखायला आल होत (कशी सहन करत असेल बायको पासून ते त्याच घरातल वातावरण इथपर्यंतचे जोकसं ).

    पहाटे लवकर उठून आणि आम्ही पुन्हा कोकणकड्याकरून साधले घाटाकड निघालो. ज्या खिंडीतून आम्ही चढलो त्याच खिंडीत पुन्हा पोहचलो आणि आता उजव्या हाताला निघालो. १० मिनिटातच वाट खाली असलेल्या शेतात दाखल झाली. इथून पुढच काही सुचल नसत आणि आम्ही नक्कीच भरकटलो असतो जर आम्हाला एक भालकरी गावकरी भेटला नसता तर, तो शिकारीसाठीच आलेला, हातामध्ये जुन्या काळातला पण मजबूत आणि खुर असा, तसा भाताच्या शेतीला प्राचीन काळापासून एकच मोठा शत्रू आहे तो म्हणजे रान डुक्कर. आणि कधी मध्ये दिसणारा बिबट्या असतोच म्हणून हत्याराशिवाय जगन नाही त्या लोकांच.देवासारख धावून येणाऱ्या माणसांन पाण्यापर्यंत सोडलं तिथून वाट सांगितली.(इथ मात्र माणुसकी दिसते)



    आम्हाला वाटल कि सरळ सोप्पी वाट असेल पण पुन्हा एकदा नळीच्या वाटेसारखी वाट दिसत होती, मात्र बर्याच लोकांना आधी विचारले होते आणि त्यांनी पण सांगितलं होत कि बिना रस्शीची उतरण शक्य आहे. नळीत उतरताना एका दगडावर लिहाल होत "केळेवाडी" म्हणजे आपण बरोबर आहे याची खात्री पटली.पुढ वाट उतरली तर सगळी दगडाची पाण्याची वाट चुकल्यासारख वाटत होत, पुन्हा अवघड अशे मोठे टप्पे लागले, कसबस तिथून उतरून पुढ खाली आलो. जरा शोधाशोध केली तर तिथच पुढ उजव्या कुशीवरून सोप्पी पायवाट लागली. पायवाटेला लागलो तर थोडे लोक धबधब्याच्या वाटेनेच खाली जात होती. आता परत येन नको म्हणून पुढ वाट एकत्र येईन अशा भाबड्या आशेन ते तसच चालत राहिले. बाकी आम्ही राजपथावरून निघालो. पण लळूहळू दरी रुंद होत गेली आणि पुन्हा सर्व चुकतील म्हणून एकत्र आणण्यासाठी दरीकड उतरलो. मग बर्याच आवाजाच्या प्रयत्नाने ते चुकलेले 7 जण पुन्हा धारेला लागले. उन तापत होत. सकाळपासून चहा सुद्धा न घेता चालणारे आम्ही आता मात्र थकलो होतो. पण पायवाट मळवट असल्याने हायस वाटत होत.

    वरून निघताना त्या भल्या माणसाने सांगितलं होत कि उतरलं कि डावीकड गेल कि वाल्हीवरे गाव आणि उजवीकड गेल कि केळेवाडी, पण आमचा driver म्हणजेच मोर्चा सांभाळणारा उजवीकडच गेला. मग मागोमाग सर्व तिकडच, रस्ता चुकण्याच फळ आम्ही याआधी घाम देऊन चाखल आहेच. पण यावेळी रस्ता चुकलो आणि गेलो केळेवाडीमध्ये, गावात गेल कि सर्व जण गावातल्या किराणा दुकानावर तुटून पडणार अस बिना सांगता ठरलच होते, कारण हॉटेल तर नव्हतेच. प्रत्येकाच्या मनान ठरवलं होत कि आता बिस्कीट पुडा, कुरकुरे, आणि पुढ पुण्याच्या रस्त्याला लागल्यावर जेवण.

    पण आज परमेश्वराला दया आली असणार, केळेवाडी मध्ये आज लग्न होत, आणि प्रमुख पाहुणे म्हणून आम्हीच ! अशावेळी लग्नात पैसे देऊन पण जेवण केल असत पण केळेवाडी चे सर्व लोक चांगली होती त्यांनी मोठ्या हौसेन आणि मानन जेवू घातलं. लग्नाच्या पहिल्याच पंगतीत  जेवण वाढल होत  (गावात पंगतीची प्रथा असते कि सर्वांनी एकसाथ सुरवात करायची )पण भूकेपुढ काहीच सुचत नसत. धीरज म्हणजे ट्रेक चा कट्टर मावळा पंगतीत  बसला होता...जसा  लाडू आला तसा त्याने उचलला अन घास खाल्ला, आजूबाजूचे लोक बघू लागले. घास खाली ठेवला. लोकांचे तिरके कटाक्ष टाळत त्याने हसून जेवण चालूच ठेवलं. दिपाली तर बायकांच्या line ला अशी बसली कि जशी त्या गावाचीच आहे. आमच्यातले काही जण चुकून नवरीच्या घरासमोरच्या मंडपात बसले (पण तिथ जेवण नव्हतच, अधाशासारख स्वतःच विचारलं कि  मग कळल कि जेवण दूसरीकड चालू आहे,) धावतच मंडपात आले. भूकेसमोर लाज माणूस सोडतो याची प्रचीती येत होती.



    जेवणाचा मेनू होता मस्त पैकी सुवासाचा तांदूळ भात आणि त्यावर डाळीची आमटी, सोबत वांग-बटाट भाजी, फ्लोवर सुद्धा, आणि बुंदीचा लाडू. इकडच्या जेवणाची खास गोष्ट म्हणजे दिवाळखोरीच जेवण नसतच, साध लग्न साध जेवण. पंच्पक्क्वान खाऊन झाल. कुणाची वाट न बघता आशीर्वाद दिला कि असाच गोड संसार करा म्हणून. आता पुढे केळेवाडी ते वाल्हीवरे पायी अंतर 15 मिनिटच, मग घरच. पण संकटे काही संपली नव्हती. आम्ही नेलेली 4 चाकी कारची battary उतरली होती, धक्के मारून झाले पण काही फायदा झाला नाही. काळ पहाटे गाडी पार्क करताना light चालू राहिली होती, झाल... आता गाडी चालू करायला दुसर्या गाडीची battery लागत होती. तासभर शोधल्यावर सरपंचाने tractor ची battery दिली. थोड्या नवख्या प्रयत्नाने चालू झाली. राहुल च्या चेहऱ्यावर खूप आनंद झाला होता.
मजल दार मजल करत शेवटी आम्ही पुण्यात रात्री 12 वाजता दाखल झालो.

विशेष आभार सर्वांचेच (१९) ज्यांनी मला 2 दिवस सहन केले.
आपलाच,
पंकज माने (भटका)(8668251375)
pankaj.anil.mane@gmail.com

alfa


 

#trek
#trekking
#sahyadri
#harishchandragad
#nalichi_wat
#sadhale_ghat
#नळीची_वाट